Thursday, April 24, 2014

कविता

कुठवर चालणार असे 
बोट धरून दुसऱ्याचे
आतातरी निवडावयाचे 
मार्ग तू स्वताचे 

      नाही शिकणार जीवनरीत
      वाचून गणित शास्त्र 
      बांधून घे अनुभव गाठीला 
      कामी येईल हेची अस्त्र 

पोळतील तुझे पाय जेव्हा 
जीवन धडा शिकशील खरा 
घेई दुख जाणून जणांचे 
जीवन शिक्षणाचा खेळ सारा 

       ओळखाया लागशील जेव्हा 
        मन दुसऱ्याचे अजाण
       जीवनाचे कोडे थोडे 
       उलगडेल हे जाण

                                - विवेक शेळके 

Tuesday, April 22, 2014

'अर्थ ' डे च्या निमित्ताने .....

कुणी म्हणतंय आई तुला 
कुणी म्हणतंय धरणी माय
तुझ्या विना कुणालाही 
आसरा इथे मिळत नाय 

तुझ्याच उदरातून जन्मले सारे 
तूच केलास माय सांभाळ 
पण बघतेस न आई तुझी 
आज  कशी होतेय आबाळ

उदरावर ज्यांना वाढवलस तू 
त्यांनीच तुझ्यावर घातला घाव
शोधतोय म्हणे नवीन रहस्ये 
साजुकतेचा आणत आव 

कशी करतेस सहन तू 
झेलतेस तू निर्दय घाव 
होतेय कत्तल तुझ्या निसर्गाची
विकासाचं घेऊन नाव 

उघड्या डोळ्यांनी पाहतेस तू
अशीच मनमानी चालणार काय 
या भाबड्याना कळत का नाही 
तुझ्याविना कुणी राहणार नाय 

                              - विवेक शेळके

Tuesday, April 15, 2014

हे युवका...

कशासाठी हे जगणे असले
निरर्थक अन लाचारीचे
कशासाठी जोखड वाहावे
आजन्म गुलामगिरीचे

हो स्वतंत्र अन घे भरारी
उभा कर डोलारा
हे युवका तूच आहेस
तुझा मालक खरा

शोध घे तू नव्याचा
नकोच जुन्या वाटा
जरी काटे असंख्य रुतती
मागे वळू नको आता

संधी अनंत येती तुजला
सोन करण तुझ्या हाती
उभा ठाक एकटा निश्चल
आशीर्वाद तुझ्या पाठी .

                         - विवेक शेळके  

" दे रोजगार "

घेतलं शिक्षण बांधलं गाठी
कौशल्याची शिदोरी पाठी
रोजगार मी शोधीत फिरतोय
फिरतोय मी दारोदार
दे रोजगार  दे रोजगार
आहे भरोसा क्षमतेवर  पण
नशीब खातय माती
बिनकामाचे रुजू होती
' लायकच' भरडले जाती
लायकी आमची सिध्द करू
सिद्ध करू हो वारंवार
फिरतोय मी बेकार देवा
दे रोजगार दे रोजगार
नोकरी मागतोय शिक्षणावर
मग वशिला कशासाठी
घाम गाळुनी किमत मोजू
चिरीमिरी का देऊ हाती
मेहनत करुनी जगा दाखवू
उभा करू सहकार
हात जोडूनी विनंती देवा
दे रोजगार दे रोजगार

                         -विवेक शेळके 

प्रारब्ध

माझं मन तुला कसं कळणार
हृदयाच्या जखमा खोलवर
कोरड्या मनाने कशा दिसणार
विचारच केला नाहीस कधी माझा
मग परकाच ना भासणार
माझ्या डोळ्यातील शुष्क अश्रू
तुला कसे ग दिसणार
प्रारब्धच आहे माझे
तुझ्याविना जगण्याचे
नशीबच, ते कसं बदलणार

                     - विवेक शेळके 

जेव्हा दिसतेस तू

जेव्हा दिसतेस तू
काहूर माजतय मनी 
विणलेल्या सर्व स्वप्नांचं
होतंय ग पाणी पाणी 

जेव्हा दिसतेस तू 
मन वेडावत माझं 
आनंदाच्या क्षणालाही 
तुझ्या विरहाचा साज 

जेव्हा दिसतेस तू 
मन कशातच रमत नाही 
कितीही ठरवलं तरी 
दुख पचवायला जमत नाही 

जेव्हा दिसतेस तू 
मन मलाच सांगत राही 
तुझ्याविना जगणे हे 
जगणेच नाही 

जेव्हा दिसतेस तू 
जीव थरथरत राही 
तुझ्या आठवणींचा झरा 
माझ्या डोळ्यांतून वाही

                       -विवेक शेळके 

Sunday, April 13, 2014

तुझे आहे तुझपाशी

तुझे आहे तुझपाशी
शोधिशी कारे अकारण
नाही अन्यत्र भेटणार
शोध रे तुझे अंतकरण
वेळ दवडशी जमवण्यात
वित्त सत्ता संपत्ती
सर्वची आहे तुझपाशी
जमवणार तू किती
जमविलेस त राशी राशी
हिरे माणिक मोती
कवडीमोल हि ठरतात
अनमोल अशी हि नाती
अनमोल संपत्ती मानवतेची
विसरलास तू कशी
शोधिशी कारे आकारण
तुझे आहे तुझपाशी

                             - विवेक शेळके  

Saturday, April 12, 2014

वोट के लिये नोट


               वोट के लिये नोट

निवडणुका जवळ आल्या
तशी सुरु झाली लगीनघाई
मतांच्या मागणीसाठी
उमेदवारांची शिष्टाई

मीच तुमचा नेता शोभतो
सगळेच पटवून द्यायला लागतात
सत्ता भोगून काम न करणारेही
पुन्हा पुन्हा मत मागतात

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
दोन्ही बाजूंनी झाडल्या जातात
उमेदवार राहतात ‘ सेफ ’
कार्यकर्त्यांची डोकी फुटतात

इतकं सगळ करुनही कळत
हाती काहीच लागणार नाही
हात जोडून मतदात्यांना
आता काही भागणार नाही

सत्ता मिळवण्यासाठी
मनात नीतिमत्तेची खोट
मग सुरु होतो तोच खेळ
“ वोट के लिये नोट “

                         - विवेक शेळके