Friday, July 15, 2016

येते सर पावसाची.....

येते सर पावसाची
चिंब भिजवूनी जाते 
ओल्या ओल्या मनाने
गीत जणू गाते

थेंब टपोरे टपोरे 
असा धरतात ताल 
पानां पानांतून तरु
त्याला लावतात चाल 

गार वारा सोबतीला 
एक आल्हाद जाणीव
सखे रिमझिम पावसाला
भासे तुझीच उणीव

    @ विवेक शेळके

Monday, December 14, 2015

तू निघून गेल्यापासून....



तू निघून गेल्यापासून.........





तू  निघून गेल्यापासून 
दारातला चाफाही झुलत नाही 
माझ्या अंगणातली तुळसही 
आता पहिल्यासारखी फुलत नाही 
तू निघून गेल्यापासून 
चिमण्यांचा चिवचिवाट हि थांबलाय 
नवे घरटे बांधण्यासाठी 
हुरूपही नवा मिळत नाही 
तू निघून गेल्यापासून 
शब्दही मुके झालेत 
मनातून तुझ नाव 
ओरबाडून हि निघत नाही 
माझ्या अंगणातील तुळसही 
आता पहिल्यासारखी फुलत नाही 

                                       @ विवेक शेळके 

Monday, October 6, 2014

कविता

आईची माया असतेच खूप न्यारी
मऊ उबदार असं काहीतरी
गंध मायेचा , अन शिडकावा प्रेमाचा
आईच्या मायेत मन घरी न दारी
नसतो ठाव ठिकाणा इथे ,
नसतो लवलेश स्वार्थाचा
आई तूची एकच देव
पालनहार धरतीचा 

देशाचा गरीब सुपुत्र

माझी कविता- देशाचा गरीब सुपुत्र 


मीही शिकलो असतो तर
किती चांगलं झालं असत
मीही काहीतरी बनलो असतो
तर किती चांगलं झालं असत
जर एवढी गरिबी नसती आपल्या देशामध्ये
माझ्या सारखा प्रत्येक बालक पोट भरून
जेवला असता , तर किती चांगल झालं असत
माझ्या वयाच्या बालकांना जेव्हा
मनसोक्त खेळताना पाहतो ,
जर मीही मजुरी न करता अस मनसोक्त खेळलो
असतो , तर किती चांगलं झालं असत
आई बाबा जेव्हा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी
हताशपणे पाहतात एकमेकांकडे ,
तेव्हा मनात विचार येतो मी जन्माला आलो नसतो
तर किती चांगलं झालं असत
जेव्हा आई उपाशी झोपते ,
मला शिळंपाक खाऊ घालून
तेव्हा मनात विचार येतो मी श्रीमंत असतो
तर किती चांगलं झालं असत .


          विवेक शेळके 

आई असते.....

माझी कविता -आई असते..... 


आई असते वृक्ष मायेचा
आई असते छाया
आई निर्मल झरा पाण्याचा
आई असते कोमल काया
आई असते आधार वड
आई असते श्वास
आई असते प्रेमळ आसरा
आई देवाचा वास !!!!!


 @ विवेक शेळके 

सत्य

सत्य


स्वर्ग हवाय सर्वांना
मरणाला कुणी तयार नाही
शांतता हवी सर्वांना
शांतता कुणी पाळत नाही
प्रेम हवंय सर्वांना
प्रेम कुणी देत नाही                                                              
सर्वांना व्हायचंय आनंदी
पण दुसऱ्यांना आनंद द्यावा
असं कुणाला वाटत नाही


@ विवेक शेळके 

बालगीत

बालगीत
                    अगडबम ढगडबम
                      हत्तीबुवा आले
इवलीशी शेपटी त्यांची
डुलू डुलू हाले
लांब लांब कानांचे
ससोबा भारी
लाल लाल गाजर पाहून
 होते खुश स्वारी  
कोल्होबांची कोल्हेकुई
भुईला भार
गोड गोड द्राक्ष
आंबट लागतात फार
हूप हूप माकडोबा
वात्रट भारी
भोळसट प्राण्यांची
काढतात खोडी
ईटू पिटु खारुताई
दुडू दुडू पळे
खायला हवी तिला

गोड गोड फळे